छत्रपती शिवरायांचा चरणस्पर्श झालेल्या भूमीतून शुभसंकेत घेऊन येणाऱ्या या संकेतस्थळावर आपलं मनःपूर्वक स्वागत! छत्रपती संभाजीराजांचे पुत्र छत्रपती शाहूराजांनी निर्मिलेल्या स्वराज्याच्या राजधानीत शिंगतुताऱ्या आणि नौबती झडू लागल्या आहेत. हा विजय तुमचा-आमचा, तमाम मराठी रयतेचा आणि शिवछत्रपतींनी राजव्यवहारातून काटेकोरपणे जपलेल्या मराठी भाषेचा. हा उत्सव मायमराठीच्या शिरपेचात झळकत असलेल्या अभिजात भाषेच्या अनमोल रत्नांचा. हा उत्सव शताब्दीपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा.
मराठी मनात उसळणाऱ्या आनंदलहरींचा त्रिवेणीसंगम, ही आनंदाची आणि अभिमानाची बाब. एक म्हणजे साहित्यरसिकांचा हा नव्याण्णवा वार्षिकोत्सव. आता शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू होणार. ती स्वराज्याच्या राजधानीतून होणार, हा दुसरा योगायोग आणि तिसरा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी मातीत होत असलेलं हे पहिलंच साहित्य संमेलन.
गौरवशाली इतिहासाबरोबरच निसर्गाचा भरभरून आशीर्वाद लाभलेला हा परिसर रसिकमनाला भुरळ घालणारा. साहित्यनगरी जिथं उभी राहते आहे, त्या मातीला लढाऊ बाण्याचा सुगंध आहे. शिवकाळ असो वा स्वातंत्र्यसंग्राम... सज्जनगडाचा विवेक आणि अजिंक्यताऱ्याची धडाडी घेऊन सातारा सतत जागता राहिला; लढता राहिला.
प्रतिसरकार स्थापणाऱ्या क्रांतिसिंहांची गर्जना या मातीने ऐकली आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण इथेच जन्मले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. याच मातीत जन्मलेली सावित्रीमाई दगडांचा मारा झेलत मुलींना ज्ञानामृत देण्यासाठी झगडत राहिली आणि कर्मवीरांनी गोरगरिबांची मुलं खांद्यावरून आणून याच मातीत शिकवून मोठी केली. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी आपल्या चळवळीतून समाजाला विवेकाची दृष्टी दिली. कला, क्रीडा, आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांत भरीव कामगिरी करणारा सातारा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी झालेल्या संघर्षातही मागे राहिला नाही. एकीकडे भाषातज्ज्ञ संशोधनासाठी प्रयत्नांची शिकस्त करत असताना...
दळ सिद्ध जाले । मुहीम केली
या बाण्याने सातारचे शिलेदार थेट दिल्लीला भिडले; लढले. तज्ज्ञांच्या अभ्यासाला कृतिशील रसद पुरवत राहिले.
अशी ही नगरी मायमराठीच्या लेकरांच्या स्वागताची जय्यत तयारी करतेय. कार्यसिद्धीपर्यंत आपण या संकेतस्थळावर भेटत
राहू; विचारांची देवाणघेवाण करू. हा मंगल उत्सव सर्वांच्या सहकार्यातून यशस्वी करू.
पुनश्र्च हार्दिक स्वागत!
आपला,
विनोद कुलकर्णी
कार्याध्यक्ष, ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा
लवकरच उपलब्ध होईल...
लवकरच उपलब्ध होईल...
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १, २, ३ आणि ४ जानेवारी २०२६ या कालावधीत साताऱ्यातील छ. शाहू स्टेडियम येथे
संपन्न होत आहे.
अधिक माहितीसाठी वर दिलेल्या बटणावर क्लिक करून संमेलन स्थळ नकाशा पहा.
लवकरच उपलब्ध होईल...
सस्नेह नमस्कार!
शताब्दीपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष या नात्याने मी या संकेतस्थळावर आपलं स्वागत करतो. मराठी मनात स्वत्वाची, स्वाभिमानाची पेरणी करून शिवछत्रपतींनी उभारलेल्या स्वराज्याच्या राजधानीत होत असलेल्या या सोहळ्यासाठी आपणास आमंत्रित करताना मला मनापासून आनंद होतो. स्वराज्यसंस्थापकांचा वारसा लाभल्याचा अभिमान केवळ मलाच नाही, तर या शहरालाही आहे. तब्बल ३३ वर्षांनंतर इथे साहित्य संमेलन होत आहे. हा सोहळा आपणा सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने संस्मरणीय होईल, यात शंकाच नाही. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी सातारा आणि मावळा फौंडेशन सातारा ने अत्यंत आपुलकीनं आणि विश्वासानं या संमेलनाचं स्वागताध्यक्षपद माझ्याकडे सोपवलं आहे. ही जबाबदारी पेलताना सर्व स्तरांवर मी प्रयत्नांची शर्थ करेन, असं अभिवचन देतो. स्वराज्याची गंगा अवतरावी म्हणून जसा प्रत्येक मावळा भगीरथ झाला, त्याच धर्तीवर या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी आपण सर्वांनी खांद्याला खांदा लावून प्रयत्नरत राहावं, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या कल्पना, सूचनांचं स्वागत करतो आणि सक्रिय सहभागाची खात्री बाळगतो.
आपला,
ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले,
स्वागताध्यक्ष, ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा
सामाजिक माध्यमे