Logo

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा - शाहूपुरी, सातारा आणि

मावळा फौंडेशन, सातारा आयोजित

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे,


९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा - २०२६

Logo

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा - शाहूपुरी, सातारा आणि

मावळा फौंडेशन, सातारा आयोजित

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे


९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा - २०२६


शुभेच्छा संदेश


खा. श्री. छ. उदयनराजे भोसले
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले,
खासदार, सातारा

आपली मायबोली मराठी भाषेला अभिजात भाषेचा नुकताच गौरव प्राप्त झाला आहे. मराठी भाषा निश्चितच जितकी कोमल प्रेमळ तितकीच कठोर म्हणून ख्यातकिर्त आहे. कशीही असो, आपल्या सर्वांना मराठी भाषेचा अभिमान आहे. मराठी भाषेमधील कथा-कादंब-या, तुकाराम गाथा ज्ञानेश्वरीसह संतसाहित्य, काव्ये महाकाव्ये, नाट्ये महानाटये इत्यादी विविध प्रकारातील साहित्य आपल्याला पहायला मिळते. मराठी साहित्य अधिकाधिक वर्धिष्णु व्हावे, त्याचा प्रचार-प्रसार होवून लोकाभिमुख व्हावे, त्याव्दारे समाजाला एक सकारात्मक जीवनाची दिशा मिळावी म्हणून अखिल भारतीय स्तरावर मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात सुमारे शे-सव्वाशे वर्षापूर्वी झाली. त्याला संघटीत रुप मिळाल्यावर, यंदाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, मराठा साम्राज्याची चौधी राजधानी असलेल्या सातारा नगरीत म्हणजेच आपल्या शाहूनगरीत होत आहे हे आपल्या सर्वांना अभिमानास्पद आहे.

पूर्वी 66 वे संमेलन सातारा येथे दिमाखदारपणे झाले होते. त्यापूर्वीही एक दोनवेळा सातारा येथे साहित्य संमेलन झाले आहे. त्यामुळे पंदाचे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आहेत तर जेष्ठ पत्रकार आणि मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष श्री. विनोद कुलकर्णी हे कार्याध्यक्ष आहेत. त्यांना आमच्यासह सर्वांचीच साथ आहे त्यामुळे सातारा येथे स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज थोरले नगरीमध्ये दिनांक 01 ते 04 जानेवारी 2026 या कालावधीत होणारे 99 व संमेलनाचे नियोजन दर्जेदार, नेटके व स्मरणात राहील असे होईल अशी धारणा आहे. या संमेलनाच्या निमित्ताने अटकेपार" या शिर्षकाखाली साहित्यविषयक स्मरणिका प्रकाशित होत आहे. साताराचे थोरले छत्रपती शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली कटक ते अटक पर्यंत स्वराज्याचा साम्राज्यविस्तार झाला. या मराठा साम्राज्याची ताकद व विस्तार, धोरल्या छत्रपती शाहू महाराजांचे कुशल प्रशासन, तत्कालीन व्यक्तीमत्वांनी गाजवलेला पराक्रम याची पूनजाणिव निश्चितपणे "अटकेपार" या स्मरणिकेव्दारे जनमानसामध्ये होईल असा विश्वास आहे.

गेल्या अनेक वर्षापासून, साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यासाठी अनेक शहरे जिल्हे सातत्याने आग्रही आहेत. सातारला सुध्दा साहित्य संमेलन होण्यासाठी आमचे मित्र, जेष्ठ पत्रकार आणि साहित्यिक श्री. विनोद कुलकर्णी हे गेली 11-12 वर्षे चिकाटीने प्रयत्न करीत होते. प्रत्येक वर्षी संमेलन दुसरी कडे गेले, तरी नाऊमेद न होता ते पुन्हा प्रयत्न करीत होते. त्यांच्या अधक प्रयत्नांमुळेच 99 वे साहित्य संमेलन त्यांनी साता-यामध्ये अक्षरशः खेचून आणले आहे. त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्षपद श्री विनोद कुलकर्णी यांच्या रुपाने साता-याला लाभले आहे ही अभिमानस्पद घटना आहे. 1993 च्या 66 वे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष कै. श्री. छ. अभयसिंहराजे उर्फ भाऊसाहेब महाराज होते, त्यांचेच सुपूत्र ना.श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे 99 वे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत हा एक दुर्मिळ योगायोग आहे. मराठा साम्राज्याच्या राजधानीत, उभारण्यात येणा-या थोरले छत्रपती शाहू महाराज नगरीत, होत असलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून पानिपत कार मा. श्री. विश्वास पाटील लाभले हा आणखीन दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल.

या पार्श्वभुमीवर संमेलनाच्या निमित्ताने प्रसिध्द होणा-या "अटकेपार" या स्मरणिकेस आमच्या मनापासून शुभेच्छा...

सामाजिक माध्यमे