छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या जयंती व पुण्यतिथीचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करणे, तसेच त्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करणे, हे या फौंडेशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यांच्या नावाने समाजातील व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर "छत्रपती शाहू महाराज फेस्टिव्हल" चे आयोजन करणे, यांमधून त्यांच्या कार्याची व्यापक ओळख निर्माण केली जाईल. त्यांच्या चरित्राचे संशोधन करून विविध पुस्तकांचे प्रकाशन करणे, तसेच साहित्यविषयक कार्यक्रम, व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्र व साहित्य संमेलनांचे आयोजन करणे, हेही महत्त्वाचे उपक्रम आहेत.
मराठी भाषा संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जातील. विविध क्षेत्रांतील व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देऊन सन्मानित करणे आणि आवश्यक ती मदत करणे, लोककला, नाट्य, सिनेमा क्षेत्रातील कलाकारांना मोफत मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे, तसेच सामाजिक उपक्रमांवर आधारित लघुपट, चित्रपट, नाटके निर्मिती करणे, हाही या योजनेचा भाग आहे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथालयाची उभारणी व विविध उपक्रमांचे आयोजन केले जाईल.
धर्मादाय स्वरूपाचे रुग्णालय उभारून गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवली जाईल. मोफत वृद्धाश्रम, बालकाश्रम, शिशुगृहे व अनाथाश्रम चालवले जातील. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत व मोफत मदत केंद्र चालविणे, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व साहित्य पुरवठा केला जाईल. ग्रंथालय व अभ्यासिकांद्वारे शैक्षणिक साहाय्य, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, मोफत अभ्यासिका, शिष्यवृत्ती योजना यांचा समावेश असेल.
समाज प्रबोधनासाठी निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन, शासनमान्य खेळांच्या स्पर्धांचे आयोजन व खेळाडूंना प्रोत्साहन, सोशल मिडीयाचा प्रभावी वापर यासाठी जनजागृती, मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन, अंध, अपंग, दिव्यांगांसाठी कार्य आणि उद्योग-व्यवसायासाठी आवश्यक प्रशिक्षण मोफत देणे, हेही या उपक्रमाचे महत्त्वाचे पैलू आहेत.
सामाजिक माध्यमे