म.सा.प शाहूपुरी शाखा ही १४ वर्षांपूर्वी स्थापन झाली असून, मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत आहे. दरवर्षी २७ फेब्रुवारीला कवी कुसुमाग्रज जयंतीपासून ते १४ मार्चला विंदा. करंदीकर पुण्यतिथीपर्यंत मराठी भाषा पंधरवड्याचे आयोजन केले जाते. या काळात विविध सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रम राबवले जातात.
शाखेने विभागीय साहित्य संमेलन, समीक्षा साहित्य संमेलन तसेच युवा नाट्य संमेलनाचे आयोजन केले आहे. शाखेने चार वर्षे सातारा साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. पहिले संमेलन बाबा आमटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ झाले आणि त्यांच्या कार्याला ₹२.२० लाखांची मदत करण्यात आली. दुसरे संमेलन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त झाले, ज्यात ११ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत करण्यात आली. तिसरे संमेलन विज्ञान संमेलन म्हणून साजरे झाले आणि विज्ञान परिषदेला मदत करण्यात आली. चौथे संमेलन कै. छ. सुमित्राराजे भोसले यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने दोन दिवसीय आयोजित करण्यात आले. शाखेच्या वतीने व्याख्याने, कविसंमेलने, परिसंवाद, पुस्तक प्रकाशने, मान्यवरांच्या मुलाखती यांचे नियमित आयोजन केले जाते. शिवार साहित्य संमेलनाचे आयोजन शेतकऱ्यांच्या शेतात गेली तीन वर्षे केले जाते. वाङमय मंडळांतर्गत विविध पुस्तकांवर चर्चा होतात आणि त्यात साहित्यिकांचा सक्रिय सहभाग असतो.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी शाखेने शासन स्तरावर प्रयत्न केले आहेत. मा. पंतप्रधान आणि मा. मुख्यमंत्री यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार केला गेला. पंतप्रधानांना १ लाख पत्रे पाठविण्यात आली. या अभियानात मा. ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि म.सा.प पुणेचे कार्याध्यक्ष मा. श्री. मिलींद जोशी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे धरणे आंदोलनही करण्यात आले.
‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत विविध शाळांमध्ये लेखक विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांचे मर्ढे गावातील नामशेष होणारे घर, त्यांच्या उच्च विद्याविभूषित मुलाने शाखेला जतन व नूतनीकरण करण्यासाठी स्वतःहून दिलेले आहे. शाखेने घराचे नूतनीकरण करून त्याचे स्मारकात रूपांतर करून उद्घाटनदेखील केलेले आहे. दरवर्षी मर्ढे येथे त्यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. सातारा जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांच्या घरांचे आणि स्मारकांचे दुरुस्ती, सुशोभिकरण व पुतळा स्थापनेचे कार्य प्रगतीपथावर आहे. रहिमतपूर येथे कवी वसंत कानेटकर यांचा पुतळा बसवण्यात आला असून लवकरच कवी गिरीश यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. लेखन कार्यशाळा आणि सूत्रसंचालन कार्यशाळांचे यशस्वी आयोजनही करण्यात आले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड बिनविरोध आणि सन्मानाने व्हावी, यासाठी शाखेने म.सा.प. पुणे यांना प्रस्ताव दिला होता, तो अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाने स्वीकारला. मा. नरेंद्र दाभोळकर यांच्या नावाने सातारा नगरपालिकेच्या पुरस्कार निवड समितीवर शाखेला प्रतिनिधित्व मिळाले आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या छ. शिवाजी कॉलेज आणि आझाद कॉलेजबरोबर सामंजस्य करार करून शाखेच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मर्ढे गाव 'कवितांचे गाव' व्हावे, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. बा. सी. मर्ढेकर यांच्या सरकारी स्मारकाचे काम आणि लोकार्पणासाठी पाठपुरावा केला जात आहे. शासनाने तयार केलेल्या स्मारक समितीवरही शाखेला प्रतिनिधित्व मिळाले आहे.
डॉ. रविंद्र कोल्हे यांच्या कार्याला मदत करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सादरीकरणाची संधी मिळावी यासाठी शाखेने विशेष प्रयत्न केले. यामध्ये रवींद्र बेडकिहाळ, विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत, सोपानकाका चव्हाण यांच्या प्रयत्नातून अनेक साहित्यिकांना संधी मिळाली आहे, ज्यात डॉ. राजेंद्र माने, किशोर बेडकिहाळ, प्रदीप कांबळे, स्नेहल दामले, डॉ. अदिती काळमेख, डॉ. सचिन जाधव, शुभांगी दळवी, डॉ. महेश गायकवाड यांचा समावेश आहे.
सामाजिक माध्यमे