मा. ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकारणी, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि सातारा गादीचे वारस आहेत. ते सध्या महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत आहेत. मा. ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा जन्म ५ ऑगस्ट १९७१ रोजी झाला. त्यांचे वडील कै. श्री. छ. अभयसिंहराजे भोसले, हे सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार व राज्य सरकारमध्ये मंत्री होते. त्यांचे चुलत बंधू मा. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, हे सध्याचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. मा. ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे यांनी अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा येथून शालेय शिक्षण घेतले.
मा. ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर सातारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. यानंतर त्यांनी २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ या निवडणुकांमध्येही विजय मिळवला. २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. १५ डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले आहेत.
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधी मध्ये साताऱ्यात होणार असून, स्वागताध्यक्ष पदावर मा. ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाच्या आयोजनामध्ये ते सक्रिय सहभागी आहेत. संमेलनाच्या इतिहासामध्ये पिता-पुत्र स्वागताध्यक्ष होण्याचा दुर्मिळ आणि दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे. त्यांच्या स्वागताध्यक्ष पदाच्या निवडीने पिता-पुत्र स्वागताध्यक्ष होण्याचा विक्रम साताऱ्याच्या नावावर नोंद झाला आहे.
सामाजिक माध्यमे