अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सातारा या ऐतिहासिक नगरीत, स्वराज्याच्या राजधानीत, ज्येष्ठ साहित्यिक श्री. विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित होत असल्याचे समजून मला अत्यंत आनंद झाला आहे.
मराठी साहित्य संमेलन म्हणजे मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचा उत्सव होय. हे संमेलन म्हणजे विचारांचे. अनुभूतींचे, सर्जनशीलतेचे आणि संवादाचे अधिष्ठान. मराठी साहित्यप्रेमींना आवडत्या लेखक-कवींशी प्रत्यक्ष भेटण्याची, संवाद साधण्याची, विचारांची देवाणघेवाण करण्याची ही एक सुवर्णसंधी असते. साहित्य संमेलन हे महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक चळवळींना दिशा देणारे दीपस्तंभ म्हणून कार्यरत राहिले आहे.
सातारा ही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी. या भूमीवर मराठी भाषेचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा संगम आहे. त्यामुळे ९९ वे साहित्य संमेलन या भूमीवर होणे, ही एक ऐतिहासिक बाब आहे. स्वराज्याच्या या पवित्र भूमीत मराठी साहित्याचे नवे क्षितिज उघडले जाईल, नवे विचार आकार घेतील आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा मला विश्वास आहे. सातारा जिल्ह्याला थोर साहित्यिकांचा आणि वैचारिक परंपरेचा समृद्ध वारसा लाभला आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे केवळ राजकारणी नव्हते, तर एक संवेदनशील साहित्यिक, चिंतनशील लेखक आणि विचारवंत होते. याच भूमीतून बा. सी. मर्डेकर, कवी यशवंत पेंढारकर यांसारख्या श्रेष्ठ साहित्यिकांनी मराठी साहित्यविश्वात नवे मानदंड निर्माण केले. या साहित्यिकांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक प्रवाहाला नवचैतन्य दिले. साता-याच्या या वैचारिक परंपरेच्या साक्षीने होणारे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे मराठी साहित्याच्या परंपरेला अभिवादन करणारा आणि नव्या सर्जनशील विचारांना प्रेरणा देणारा ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे.
मराठी भाषा ही महाराष्ट्राची ओळख, तर मराठी साहित्य हे आपल्या समाजमनाचा आरसा आहे. आपल्या साहित्यिकांनी युगानुयुगे विचारांचा, भावनांचा, अस्मितेचा आणि परिवर्तनाचा प्रवाह वाहता ठेवला आहे. या संमेलनादरम्यान काव्यवाचन, कथाकथन, परिसंवाद, चर्चासत्रे या विविध उपक्रमांच्या माध्यमातून साहित्यरसिकांना विचारवंतांना आणि नवोदित लेखकांना एकत्र येण्याची संधी मिळेल. नव्या विचारांची बीजे पेरली जातील आणि मराठी साहित्यातील आधुनिकता व परंपरा यांचे सुंदर मिश्रण सर्वांसमोर येईल. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी, सातारा जिल्हा आयोजक मंडळ, साहित्यिक, कार्यकर्ते व साहित्यप्रेमी नागरिकांचे मनःपूर्वक अभिनंदन. या संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित होणारी 'आटकेपार' ही स्मरणिका ही मराठी साहित्य चळवळीच्या अखंड प्रवासाचे, अभिमानास्पद परंपरेचे आणि नव्या वाटचालीचे जिवंत दस्तऐवज ठरेल, असा मला विश्वास आहे.
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसह या निमित्त प्रकाशित होणाऱ्या 'आटकेपार' या स्मरणिकेच्या प्रकाशनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती अधिकाधिक बहरत राहो, नव्या पिढीपर्यंत पोहोचत राहो, याच सदिच्छा
सामाजिक माध्यमे