सूचना

तब्बल ३२ वर्षांनंतर ऐतिहासिक सातारा नगरीत साहित्याचा महाकुंभ म्हणजेच शताब्दी पूर्व ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. मा. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य, यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा - शाहूपुरी, व मावळा फौंडेशन, सातारा चे संस्थापक अध्यक्ष व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे विद्यमान कोषाध्यक्ष श्री. विनोद कुलकर्णी गेली बारा वर्षे संमेलन आयोजित करण्याचा बहुमान प्राप्त व्हावा यासाठी अहोरात्र झटत होते.

३२ वर्षांपूर्वी म्हणजेच सन १९९३ साली सातारा येथे संमेलन झाल्यानंतर सातारकरांच्या वतीने सातारा शहरात संमेलन आयोजित करण्याचा मान प्राप्त व्हावा यासाठी प्रयत्न सोडाच, साधी नामधारी मागणी देखील कोणी सातारकरांनी केलेली नाही. याचे अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे संमेलनासाठी होणारा खर्च. मात्र महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा - शाहूपुरी व मावळा फौंडेशनने अत्यंत महत्त्वाचे असे शताब्दी पूर्व ९९ वे साहित्य संमेलन सातारा नगरीतच यशस्वीरित्या आयोजित करण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. त्यामुळेच सदरच्या संमेलनाकरिता होणाऱ्या विविध खर्चाकरिता, म्हणजेच भोजन व्यवस्था, मंडप व्यवस्था, संकेतस्थळ विकसन, निवास व्यवस्था व इतर आवश्यक असणाऱ्या सर्व खर्चिक बाबी करिता निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. तरी आयोजकांतर्फे सर्व निविदा भरणाऱ्या पुरवठादार व्यक्ती, कंपन्यांना विनंती आहे की, त्यांनी सातारा शहराला प्राप्त झालेल्या बहुमानाचा, येथे यानिमित्ताने येणारे साहित्यिकांच्या सहवासाचा, साहित्यिकांच्या विचारांचा सातारकर यांना होणारा लाभ, इत्यादी बाबींचा विचार करूनच आपली परिपूर्ण मात्र आर्थिकदृष्ट्या होणाऱ्या लाभाचा जादा विचार न करता माफक दराची निविदा आयोजकांकडे जमा करावी, यासाठी कळकळीची विनंती करीत आहोत.

विनोद कुलकर्णी
कोषाध्यक्ष
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करिता